पंढरपूर : धनगर समाजाच्यावतीने आज गुरुवार दि. 13 ऑगस्ट राज्यभरात ठिकठिकणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व आरक्षणाच्या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहिण्याचं आंदोलन करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपची सत्ता असताना पंढरपूरला आले होते. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीने त्यांची भेट घेऊन धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरे हे विराजमान झाले. धनगर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप सध्या धनगर समाजाच्या नेत्यांकडून होत असून तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ही जाणून बुजून प्रलंबित ठेवला जातोय असा आरोप आता होऊ लागला आहे.
पंढरपूर शहरात आज गुरुवार रोजी धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर यांच्यासह अनेक धनगर युवकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यामध्ये धनगर समाजास तात्काळ आरक्षण मिळावे, मेंढपाळ बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यात यावेत, धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी अशा प्रमुख मागण्या या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

No comments:
Post a Comment