मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीतही राज्य सरकार विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळाला. भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर एकही टीकेची संधी सोडली नाही. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात मंगळवारी पहिल्यांदाच शिवसेनेचा नेता थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. परब हे फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसंदर्भात या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे परब यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

No comments:
Post a Comment