अलिबाग, जि.रायगड : येत्या 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. सर्वत्र करोनाचा प्रादूर्भाव कमी अधिक प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी यावर्षीचा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करीत अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज कोकणवासियांना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीच्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार, दत्तात्रय नवले, तहसिलदार विशाल दौंडकर, सतीश कदम, सचिन शेजाळ, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सीमा झावरे यांची प्रत्यक्ष तर खासदार श्रीरंग बारणे, आमदार रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, बाळाराम पाटील, प्रांताधिकारी, तहसिलदार, आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.
पालकमंत्री कु. आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, विशेष असा सण आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे “आपणच आपले रक्षक” या दृष्टीने विचार करून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाच्या सूचनांप्रमाणे दहा दिवस होम क्वॉरंटाईन राहावे तसेच स्वतःची स्वॅब टेस्ट करून घ्यावी, अँटीजेन टेस्ट करुन घ्यावी, गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवाव्यात, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे आयोजित करावीत.
मात्र ज्यांना करोना होऊन गेला आहे, ते त्यातून बरे झाले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या प्रवासासाठी वा येण्या-जाण्यासाठी बंधने नसावीत. स्वॅब टेस्ट, अँटीजेन टेस्ट करून मिळावी, शक्य असल्यास गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांपैकी किमान लक्षणे नसणाऱ्यांसाठी होम क्वॉरंटाईनचा कालावधी कमी करावा, अशा प्रकारच्या आणखी काही सवलती मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी विनंती केली जाईल, असे सांगून त्यांनी शेवटी शक्यतो गणेशभक्तांनी प्रवास टाळावा, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, शासनाने करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे, लहान मुले व वृद्ध नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन गणेशभक्तांना केले.
यानंतर पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्ते कामांची दुरुस्ती तसेच जड वाहनांची वाहतूक या विषयांबाबतही सविस्तर आढावा घेतला तसेच रस्ते महामार्ग कामासंबंधीच्या अधिकाऱ्यांना ही कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. त्याबरोबरच जिल्हा शांतता समिती सदस्यांनी तालुकास्तरावरील तालुका शांतता समिती बैठकीत आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असे जिल्हा शांतता समिती सदस्यांना सूचित केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सूचना मांडताना गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा होम क्वॉरंटाईन चौदा दिवसांचा कालावधी याबाबत पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना सर्व स्तरावर एकसमान असाव्यात, असे सांगून हा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे परिस्थिती चांगली असतानाचा नाही तर करोनाचे सावट सर्वत्र आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांना गंभीरपणे घेऊन त्या सूचनांचे पालन व्यवस्थित करावे, असे आवाहन केले.
या शांतता समिती बैठकीच्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी यांनीही गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेऊन शासनाने निर्णय प्रक्रिया राबवावी, असे सूचित केले.
बैठकीच्या सुरुवातीस दि.3, 4 व 5ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पूराच्या पाण्यात वाहून गेलेले व मृत पावलेले आशुतोष कुचेकर व बदर अब्दुला हलदे यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

No comments:
Post a Comment