चंद्रपूर, दि. 7 : जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. एक तर कोरोना या रोगाचे संकट असताना "दुष्काळात तेरावा महिना" अशी परिस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली आहे. ही मन पिळवटून टाकणारी घटना कळताच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सदस्य असलेल्या एमक्यूएल फाऊंडेशन या ग्रुपच्या सदस्यांनी तेथील कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी सत्यात ही उतरविला आहे.
दि. 6 सप्टेंबर रोजी त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पुरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त कीन्हीं, हरदोली व चिखलगाव येथील अत्यंत गरजू कुटुंबाना किट चे वाटप कीन्ही चे सरपंच अभयजी कूथे, हरदोली चे सरपंच सौ.भूमिका गौतम मेश्राम, चिखलगाव चे सरपंच सौ.पुष्पा पुरुषोत्तम धांडे, एमक्यूएल फाऊंडेशनचे सदस्य बालाजी ठाकरे, अतिश धोटे, कल्पना अभ्यासिका मधील अभ्यास करणारे विद्यार्थी उल्हास राऊत, योगेश निकुरे, रंजित मरस्कोले, दीपक बागडे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले .यामध्ये कीन्ही गावातील 13, हरदोली मधील 14 व चिखलगाव मधील 6 कुटुंब मिळून एकूण 33 कुटुंबांना किट चे वाटप करण्यात आले.
एकंदरीत एमक्यूएल फाऊंडेशनच्या तात्काळ मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. "आपण समाजाचे काही तरी देणं लागतो" म्हणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कार्यरत असलेले कर्मचारी व सामान्य नागरिक यांची ही, एमक्यूएल फाऊंडेशन जिथे समस्या असेल तिथे "फुल नाही पण फुलाची पाकळी" या उक्तीनुसार मदत करत असते.

No comments:
Post a Comment