![]() |
| प्रतीकात्मक |
सोलापूर : मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलाच्या वडिलांना गावातील भर चौकात चक्क झाडाला बांधून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडला आहे. पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की येथील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे.या घटनेची खंत त्या मुलीच्या संबंधित नातेवाईक व भावकीमध्ये होती. त्याचा राग मनात धरून मुलाच्या वडिलाने फोन का केला, यावरून मागील रागाचा वचपा काढत त्याला घरापासून तीन किलोमीटर अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखी मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिकरीत्या मारहाण करण्याच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment