नागपूर, दि. 31 : विदर्भात सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील तब्बल 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली आहे.. विदर्भातील या पूरस्थितीच्या मदतीला विलंब लागल्यानेच घरे व शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका फडणवीस राज्य सरकारवर केली आहे. मध्य प्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी 36 तासात पूर्व विदर्भात पोहोचते. परंतु, 36 तास हाती असतानाही विलंब केल्याने हे पाणी गावात शिरले. वेळीच अलर्ट दिला असता, तर हे संकट टाळता आलं असतं, असेही फडणवीस म्हणाले.

No comments:
Post a Comment